मानवाच्या कल्याणाचा मार्ग : विपश्यना


भगवान बुध्द हे महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. त्यांनीच ही *विपश्यना* विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. *विपश्यना* भगवान बुध्दांच्या शिकवणुकीचा सार आणि गाभा आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत *ध्यानावरच* विशेष भर दिला आहे.

*विपश्यना* ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी आणि तितकीच अवघड असून अद्वितीय आहे. ती एक निखळ सुख आणि मन:शांती मिळवून देणारी तर्कसंगत अशी साधना आहे.

या साधनेच्या अभ्यासाने स्वत:च्या शरीर व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन, त्या दूर होण्यास मदत होते. आपल्यामधील सुप्त शक्तींचा विकास होतो. त्या शक्तीचा उपयोग स्वत:च्या व इतरांच्या कल्याणासाठी करता येतो. या साधनेद्वारे केवळ शारीरिक समस्या दूर होतात, असे नाही तर जीवनात मोठा क्रांतीकारी मानसिक बदल सुध्दा घडून येतो.

ही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ही विद्या ब्रम्हदेशात मागील 2500/2600 वर्षांपासून परम परिशुद्ध स्वरूपात जतन करण्यात आली.

परमपुज्य सत्यनारायन गोयंका गुरुजी यांनी ही विधी ब्रम्हदेशातून भारत देशात आणून नाशिक जवळील इगतपुरी येथे व देशातील आणि जगातील इतर अनेक ठिकाणी दहा दिवसाच्या शिबिरातून प्रशिक्षित आचार्यांच्या माध्यमातून शिकवीत आहेत.

*विपश्यना शिबिरात* पहिला अभ्यास *आनापानसतीचा* (श्वासा चे निरीक्षण) व दुसरा *विपश्यना* (स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीत उमटणार्‍या संवेदनाचे निरीक्षण) आणि तिसरी *मंगल मैत्री* (विश्वातल्या सर्व प्राण्यांप्रति मंगल भाव करणे) शिकवले जाते.

*आनापानसती विपश्यनाचा* प्रारंभीक भाग आहे. ही एक प्राथमिक क्रिया आहे. म्हणून या शिबिरात सुरुवातीला *आनापानसती* शिकवून मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि सराव केल्या जाते. हा अभ्यास *विपश्यना* साधनेची पूर्वतयारीच असते. आन म्हणजे अश्वास, अपान म्हणजे प्रश्वास व सती म्हणजे सजगता. म्हणजेच येणार्‍या व जाणार्‍या श्वासावर लक्ष ठेवणे.

म्हणजेच या अभ्यासात शरीरात नाकावाटे सहज आणि स्वाभविक येणारा तसेच बाहेर पडणारा श्वासावर लक्ष केंद्रित केल्या जाते. आपले मन जागृत ठेवले जाते.

*विपश्यनाला* पाली भाषेत *विपस्सना* म्हटले जाते.

त्यात वि आणि पस्सना असे दोन शब्द आहेत. वि म्हणजे विशेष रुपाने आणि पस्सना म्हणजे जाणणे, पाहणे किवा अनुभूती घेणे. म्हणजेच जग जसे आहे तसे पाहणे. जगाची वास्तवता समजून घेणे. सर्व बाबींना त्यांच्या मुळ गुण-धर्म-स्वभावात पाहाणे (सत्यदर्शन) म्हणजे *विपश्यना*.

या विधीत आपल्या स्वत:च्या शरीरात उत्पन्न होणार्‍या सर्वसामान्य, नैसर्गिक संवेदनाचे पध्दतशीर व नि:पक्षपातीपणे निरीक्षण केल्या जाते. कारण संवेदनाच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूती होते. *विपश्यना* करतांना शरीर आणि मनाचे संपूर्ण सत्य अनुभवाच्या पातळीवर समजून घेतल्या जाते. *विपश्यनामुळे* मनाच्या खोल गाभ्यात बदलांची प्रक्रिया सुरु होते.

कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्याने तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. म्हणून *विपश्यनेच्या* माध्यमातून मनावर संस्कार करण्याचा अभ्यास *विपश्यना* शिबिरात शिकविले जातात. हा अभ्यास अत्यंत गांभिर्याने, नैसर्गिक वातावरणात आचार्याच्या मार्गदर्शनात भारतात आणि परदेशात वैज्ञानीक पद्धतीने शिकविल्या जाते.

मन हे सतत भरकटत असते. चवताळलेला हत्ती काहीही नुकसान करू शकतो, पण त्याला जर काबूत ठेवले तर तो चांगल्या कामात उपयोगी पडू शकतो.

तसेच मनाचे आहे. मनाला काबूत ठेवण्यासाठी *विपश्यना* हे एक चांगले साधन आहे. आपले चित्त, मन एखाद्या गोष्टीवर अथवा कार्यावर एकाग्र करणे, त्या कार्याप्रती पूर्णपणे जागृत राहणे व ते कार्य सर्वशक्तीनिशी पार पाडणे हे *आनापानसतीचा, विपश्यनाचा आणि मंगल मैत्री* चा अभ्यास करणारे चांगल्या रीतीने करू शकतात.

ह्या अभ्यासाने आपले जीवन किती अनित्य आहे, क्षणभंगुर आहे. या गोष्टीची अनुभूती च्या स्तरावर जाणीव होत असते. म्हणून या ध्यानात एकाग्रता, जागरूकता व प्रज्ञा या गोष्टींचा लाभ होतो.

सत्याच्या अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत :च्या अंतर्मनाचे आपण स्वत:च केलेले निरीक्षण होय. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग आत्मनिरीक्षणाचा, स्वत:ला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या स्वत:च्या स्वभावाचे ज्ञान करून आपल्यामधील दोष, विकार नष्ट करता येतात.

अंतर्मनातील अंधकार दूर करता येते. निसर्गाचे नियम अनुभवातून समजून घेता येते. या अभ्यासाने दु:ख, प्रक्षुब्द व ताणतणाव निर्माण करणारे कारणे शोधून त्याला नष्ट करता येतात. त्यामुळे आपले मन शुध्द, शांत व आनंदी होत जाते.

भगवान बुध्दांनी आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने आपल्या मनाच्या खोलीत शिरून सत्याचा तळ गाठला. त्यांना आढळले की, आपले शरीर अत्यंत लहान लहान परमानुंचे बनले आहे. ते सतत उत्पन्न होवून नष्ट होत असतात. म्हणजेच जीवनाच्या अनित्यतेची जाणीव होते. अनित्यतेची जाणीव झाल्याने मनुष्य कुशल कर्मे करण्याकडे वळतो. स्वतःतील दोष कमी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भय इत्यादी विकार दूर होऊ लागतात. उर्वरित आयुष्य दु:खात घालविण्यापेक्षा सुख आणि आनंदात जाते. असे अनेक फायदे *विपश्यना ध्यान साधनेने* मनुष्याला प्राप्त होतात.

शरीरातील प्रत्येक कण परिवर्तनीय व बदलत असल्याने ‘मी’ ‘माझा’ असे म्हणावे असे काहीच स्थिर राहात नाही, हे सत्य साधकाच्या लक्षात येते. त्यामुळे अनात्मतेचा बोध होतो. आणखी एक सत्य साधकाला स्पष्ट होते ते असे की, ‘मी’ व ‘माझे’ ची आसक्ती हीच तर दु:ख निर्मिती चे कारण आहे. ह्या सार्‍या गोष्टी कोणी सांगितले म्हणून नव्हे तर आपल्या स्वत:च्या अनुभवावरून संवेदनाच्या निरीक्षणामुळे समजू लागतात.

या अभ्यासात शिकविले जाते की, शरीरात उमटणार्‍या संवेदनावर कोणतीही मग ती सुखद असो, दु:खद असो की, सुखद-दु:खद असो – प्रतिक्रिया व्यक्त न करता नि:ष्पक्ष राहून केवळ निरीक्षण केल्याने दुखा:च्या आहारी जात नाही. कारण संवेदना सतत बदलत असतात. त्या कायम राहत नाही. उदय होणे, व्यय होणे हा तिचा नैसर्गिक स्वभाव असल्याचे जाणवते. म्हणून सजगता व समतेत राहिल्याने आपण दुख:मुक्त होऊ शकतो, ही गोष्ट साधकाच्या लक्षात येते.

तसेच प्रत्येक संस्कार उत्पन्न होते, लय पावते. ते परत उत्पन्न होते, लय पावते. ही क्रिया सतत सुरु राहते. आपण प्रज्ञेचा विकास करून तटस्थपणे निरीक्षण केल्यास, संस्काराची पुनर्निर्मिती थांबते. आताच्या आणि पूर्वसंचित संस्काराचे उच्चाटन झाले की, आपण दुख:मुक्तीचा आनंद उपभोगू शकतो, हेही साधकाच्या लक्षात येते.

संवेदनापासून तृष्णे ऐवजी प्रज्ञाच विकसित होते. प्रज्ञेमुळे दुखा:ची साखळी तुटते. राग व द्वेषाच्या नवीन प्रतिक्रिया निर्माण होत नाहीत. त्यामुळे दुख: निर्माण होण्याचे कारणच उरत नाही. मनाच्या दोलायमान स्थितीत घेतलेले निर्णय ही एक प्रतिक्रियाच असते. ती सकारात्मक कृती राहत नसून ती एक नकारात्मक कृती बनते.

ज्यावेळी मन शांत व समतोल असते. तेव्हा घेतलेले निर्णय हे कधीही दुख:दायक नसतात तर ते आनंददायकच असतात. जेव्हा प्रतिकिया थांबतात, तेव्हा तणाव दूर होतात. त्यावेळी आपण जीवनातील खरा आनंद उपभोगू शकतो, याची साधकाला प्रचीती येते.

आपण सुखी व आनंदित झालो की, असेच सुख आणि आनंद दुसर्‍यालाही मिळावे म्हणून कामना करतो. सर्वांचे कल्याण होवो, सर्व दुख:मुक्त होवोत, हीच तर *विपश्यना ध्यान साधनेचा* उद्देश आहे. यालाच *मेत्ता भावना* म्हणजेच ‘मैत्री भावना’ म्हणतात.

भगवान बुद्धांनी या अभ्यासाद्वारे जाणले की, मनुष्याला होणारे दु:ख हे काही दैवी कारणाने होत नसते. तर त्याला जसे इतर कोणत्याही गोष्टी कारणाशिवाय घडत नाहीत, तसे दु:खाला सुध्दा कारणे आहेत.
भगवान बुद्धांनी अखिल मानवाला दु:खमुक्त होण्यासाठी चार आर्यसत्य व अष्टांगिक मार्गाची शिकवण दिली. चार आर्यसत्यामध्ये दु:ख. दु:खाची कारणे, दु:खाचा निरोध आणि दु:ख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग यांचा समावेश आहे.

अष्टांगिक मार्गामध्ये १. सम्यक दृष्टी, २. सम्यक संकल्प, ३. सम्यक वाचा, ४. सम्यक कर्म, ५. सम्यक आजीविका, ६. सम्यक व्यायाम, ७. सम्यक स्मृती व ८. सम्यक समाधी याचा समावेश होतो. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी जसे शारीरिक व्यायाम करतो, तसेच मनाला निरोगी ठेवण्यासाठी मनाचा व्यायाम म्हणजे ही *विपश्यना* साधना होय.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जो व्यक्ती शरीराने आणि मनाने निरोगी आहे, अशा व्यक्तीला सुदृढ आणि सक्षम म्हटल्या जाते. *विपश्यना* साधनेमध्ये मानवी मन हे केंद्रस्थानी आहे. शरीरावर होणार्‍या प्रतिक्रिया ह्या मनातून निर्माण होतात. म्हणून मन हे निरोगी असेल तरच शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
ही वैज्ञानीक साधना शिकण्यासाठी विविध भाषा, जाती, धर्म, सम्प्रदाय, लिंग असलेले लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे जातीय सलोखा निर्माण होण्यात या विधीचा मोठा हातभार लागत आहे.

आज दहशतवाद व अण्वस्त्राच्या भीतीने जगात अशांतता व अस्वस्थता निर्माण होत आहे. तेव्हा जगात शांतता नांदण्यासाठी *विपश्यना* विधीची फार मोठी मदत होत आहे. जगात ठिकठिकाणी *विपश्यना* केद्रे स्थापन होत आहेत. त्यामुळे ह्या विधीचा सार्‍या जगात झपाट्याने प्रसार होत आहे.

भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांनी *कैद्यांसाठी विपश्यना* अभ्यासाची व्यवस्था केली होती. त्यामुळे गुन्हेगारी जग सुधारण्यास या विधीचा उपयोग होत आहे.

शासन त्यांच्या अधिकार्‍यांना ही विद्या शिकता यावी म्हणून *विपश्यना* शिबिराला पाठविण्याची व्यवस्था करीत आहेत. प्रशासकीय कामे करतांना मानसिक तणाव दूर होतो. ही विधी शिकतांना भगवान बुद्धांनी सांगितलेला शील-समाधी-प्रज्ञा तसेच पंचशीलेची शिकवण मिळत असल्याने साधक वर्ग नीतीमान बनत असतो. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव राहत नाही. वक्तशीरपणा, प्रामाणीकपणा हे गुण साधक वर्गात वाढीस लागत आहेत.

लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत आज शिबिरे आयोजीत होत आहेत. त्यामुळे मैत्री, करुणेचे भगवान बुध्दाचे तत्वज्ञान जनमानसात रुजत आहेत. सामाजिक सलोखा निर्माण होण्यास तसेच आजच्या अनैतिक जगात माणसाला सदाचारी, चारीत्रवान, निरोगी बनविण्यासाठी या विधीचा फार मोठा हातभार लागत आहे.
*विपश्यनेचा* व्यक्तिगत दृष्टीने नियमित अभ्यास केल्याने मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भयं असे विकार नष्ट होतात. त्यामुळे दु:ख आणि विकारातून मुक्त होवून मानवाचे कल्याण होते. तसेच सामाजिक दृष्टीने विशुद्धी, पावित्र, सदाचार, नैतिकतेचा पाया मजबूत होवून समाजविकास घडून येतो.

आज जगासमोर उपासमार, गरिबी, जातीयवाद, हिंसाचार, दहशतवाद, हुकूमशाही, युध्दजन्य परिस्थिती असे जे भयावह स्थिती दिसत आहेत, त्याला शांत करण्यासाठी भगवान बुध्दाचे समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्याय तसेच अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचे तत्वज्ञान म्हणजेच *विपश्यना विधी* हेच एकमेव उत्तर आहे. म्हणून *विपश्यना* साधना ही मानवी कल्याणाचा मार्ग आहे.

आपण सर्व *विपश्यना* करा, नियमित पणे करत रहा, आणि जास्तीत जास्त लोकांना *विपश्यना* साठी प्रेरीत करा, करित रहा.