विपश्यना शिबिर अनुभव ०१/०३ भाग - नितीन पोताडे

दहा दिवसाचे विपश्यना शिबीर इगतपुरी इथे यशस्वीरीत्या पूर्ण करु शकलो याचा आनंद वाटतोय. विपश्यनाबद्दल अनेक वर्षापूर्वी माहिती झाली होती पण तिथे प्रवेश कधी, कसा मिळतो याबद्दल कल्पना नव्हती. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला, त्यावेळेस नेटवर अधिक माहिती शोधून मनातील बहुतेक प्रश्नाची उत्तरे मिळाली. ओंनलाईन प्रवेशासाठी कोणती तारीख आणि वेळ आहे हे लक्षात ठेवून त्यादिवशी प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली. पोचपावती म्हणून नंतर कळवू एवढेच कळवले गेले. खूप मोठी प्रतीक्षा यादी (waiting list) असते असे कळल्यामुळे थोडा साशंक होतो. डिसेंबर अखेरीस प्रवेश नक्की झाल्याबद्दल उत्तर मेलद्वारे मिळाले.
आता प्रश्न पडला कि खरच जायचे कि नाही ? माझ्यासाठी उपयोगी असेल का ? 10 दिवस घरापासून दूर, त्यांना संपर्क न करता राहणे शक्य होईल का ? सर्वात मोठा प्रश्न कि मौन व्रत पाळण्याबद्दल होता. ज्यांनी यापूर्वी हे शिबीर पूर्ण केले त्याचे मार्गदर्शन घेतले. खूप बरे वाटले आणि जाण्याचे नक्की केले. त्याच दरम्यान वयाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वयाची 50 वर्ष पूर्ण होणार होती त्यामुळे जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यास मदत होईल अशी आशा होती.


सर्व तयारी करून शिबीर सुरु होण्यापूर्वी एक दिवस आधी विपश्यना केंद्र, इगतपुरी येथे सकाळी 10 वाजता पोहचलो. इगतपुरी रेल्वे स्टेशनपासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर, प्रशस्त जागेत, लोकवस्तीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात, उंच डोंगराच्या पायथ्याशी विपश्यना केंद्र आहे. राहण्यसाठी टुमदार घरे, साधना करण्यासाठी मोठे मोठे सभागृह, भोजनगृह दिसले. नविन बांधकामपण चालू असल्याचे दिसत होते.
केंद्रात शिस्त कडक आहे पण त्याच बरोबर नियोजन चांगले आहे हे जाणवले. केंद्रात पोचल्यावर सामान जमा करून फॉर्म भरणे, फोटो चिटकवणे तसचे निवासस्थानाची व्यवस्था ह्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाली. मार्गदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा ताफा तयार असे. त्यांना धम्म सेवक असे संबोधले जायचे. राहण्याची व्यवस्था सांगण्यात आली. त्यानंतर आपले सामान राहण्याच्या जागी घेवून जावे लागते. त्यापूर्वी आपल्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल एक पाकिटात टाकून त्यावर सही करून जमा करून घेतला गेला.
आत्ता इतर जगाशी मोबाईलद्वारे संपर्क तुटला होता. काही सूचना देण्यात येत होत्या. काही सामान आणायचे राहिले असेल तर संध्याकाळ पर्यन्त आणू शकता, जेवणासाठी ठराविक वेळेस भोजन गृहाकडे येण्यास सांगितले होते. स्त्री-पुरुषासाठी राहण्याची, भोजनाची आणि साधनेची स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. त्यांनी एकमेकांना कोणत्याही मार्गाने संपर्क करू नये अशी कडक सूचना दिली गेली होती.
(क्रमशः)