आषाढी पौर्णिमेला बौद्ध जगतात विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला भारतीय लोक *गुरुपौर्णिमा* म्हणून संबोधतात कारण याच पौर्णिमेला भगवान तथागतांनी पंचवर्गीय भिक्षूंना *धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा* उपदेश केला होता. देवता आणि मनुष्यांना निर्वाणाच्या हेतूने धम्म विनय शिकवणे याच दिवसापासून आरंभ झाले म्हणून भगवंतांना *देव मनुष्याचा शास्ता,* गुरु म्हणून ओळखले जाते. या महान घटनेचे स्मरण म्हणून या पौर्णिमेला सर्व भारतीय *गुरुपौर्णिमा* म्हणून साजरी करतात. तसेच या पौर्णिमेला भगवंतांच्या जीवनातील काही अन्य घटनांची जोड लाभलेली आहे. ती अशाप्रकारे-
*१. राणी महामायेचे स्वप्न*
याच पौर्णिमेच्या रात्री महामाया राणीला असे स्वप्न पडले होते कि एक शुभ्र पांढरा हत्ती सोंडेत शुभ्र कमळ पुष्प घेऊन तिच्या कुशीत प्रवेश करीत आहे. याच पौर्णिमेला तुषित कुमार बोधिसत्व, (पूर्वीचे सुमेध बोधिसत्व) यांनी महामाया देवीच्या कुशीत प्रतीसंधी ग्रहण केली होती.
*२. सिद्धार्थ गौतम बोधिसत्वांचा गृहत्याग*
जातक निदान कथेतून बोधिसत्वाने *जरा, व्याधी, मरण आणि भिक्षू* या चार लक्षणांना पाहून गृहत्याग केल्याचे दिसून येते. हे गृहत्यागाचे *उपादान कारण* आहे. *पब्बज्जा* सूत्रातून भगवंताने आपल्या गृहत्यागाचे कारण सांगताना राजा बिंबिसारास असे उत्तर दिले - हिमालयाच्या पायथ्याशी एक जनपद आहे, कौशल प्रदेशात धन आणि पराक्रमाने युक्त एक रुजू राजा आहे. जो सूर्यवंशी असून शाक्य जातीचा आहे, हे महाराज, मी त्या कुलातून प्रव्रज्जित झालो आहे. *मी काम भोगाची कामना करीत नाही. सांसारिक काम भोगांचा दुष्परिणाम आणि निष्कामतेचे गुण पाहूनच मी तप करण्यासाठी जात आहे, यातच माझे मन लागते,* *अत्तदंड* सुत्तातून *कलह करणाऱ्या लोकांना पाहून वैराग्य आल्याचे* भगवान सांगतात, *धर्मानंद कोसंबी* यांनी आपल्या *बोधिसत्व* नामक नाटकात शाक्य आणि कोलिय यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झाल्याचे चित्र रेखाटले आहे आणि ते बोधिसत्वाच्या गृहत्यागाचे *निमित्त कारण* ठरल्याचे सांगितले आहे. याच नाटकातील संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या *बुद्ध आणि त्यांचा धम्म* या ग्रंथासाठी वापरला. जरा व्याधी मरण आणि कलह या मानवी जीवनात नित्य घडणाऱ्या बाबी आहेत, याचे समाधान शोधण्यासाठीच बोधिसत्वा ने गृहत्याग केला आणि बुद्धत्वाचा मार्ग शोधून काढला, जेथे परम शांत निर्वाणाचा लाभ आहे, जेथे जाती जरा व्याधी मरण नाही, कलह नाही.
*३. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश*
बोधिसत्वा ने बुद्धत्व प्राप्तीनंतर उपदेश देण्याच्या हेतूने वारानशीला प्रयान केले. तेथील इसीपतण मृगदाय वनात राहणाऱ्या *कौण्डण्य, भद्दीय, वप्प, महानाम आणि अश्वजीत* या 5 परीव्राजकांना धम्मचक्र प्रवर्तन सुताचा प्रथम उपदेश केला, या उपदेशातुन *दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि दुःख निरोधा चा मार्ग* भगवंतांनी त्यांना समजावून सांगितला. ही घटना सुद्धा याच पौर्णिमेला घडली होती आणि हाच *प्रथम वर्षावासाचा* आरंभ होता. म्हणून संपूर्ण जगभरातील बौद्ध राष्ट्रात आणि भारतात सुद्धा याच दिवशी भिक्षु भिक्षूनि वर्षावासाचा आरंभ करतात, या निमित्ताने भिक्षु भिक्षूनिना तसेच उपासक-उपासिका ना धम्म विनयाचे पालन करता येते तसेच पुण्य संपादन करता येते,...
आषाढी पौर्णिमेला वरील काही प्रमुख घटना घडल्याचा इतिहास पाली साहित्यातून दिसून येतो, ही पौर्णिमा आपण मोठ्या उत्साहाने साजरी करावी, *दान, उपोसथ शील आणि भिक्षू संघाची सेवा* करून ही पौर्णिमा साजरी करावी. शुभ्र वस्त्र परिधान करून, भगवंतांची पूजा वंदना करून, उपोसथ सील ठेवून, विहारात असणाऱ्या भिक्षु कींवा भिक्षूनिला दान देऊन, धम्माचा उपदेश ऐकून ही पौर्णिमा साजरी करावी, हाच बौद्ध जीवन मार्ग आहे.
*सर्वांना आषाढी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभकामना!*